•  मयूर ढोपे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

हिंडलगा / वार्ताहर

आंबेवाडी गावचा सुपुत्र मयूर लक्ष्मण ढोपे (वय २८) हा जवान धिमापूर – नागालँड या ठिकाणी प्रशिक्षणावेळी अपघातात १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता हुतात्मा झाला. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री १०.१५ वाजता बेळगाव येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. कोलकात्ता येथील कमांडो हॉस्पिटल येथे उपचार करत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंबेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहे.

हुतात्मा जवान मयूर ढोपे यांचे प्राथमिक शिक्षण आंबेवाडी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण भगतसिंग हायस्कूलमध्ये झाले आहे. उत्कृष्ट खेळाडू असल्याने अवघ्या आठ वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले. 7003EME या युनिटमध्ये सेवेत रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन अविवाहित बहिणी आहेत. हुतात्मा जवान अविवाहित होता.

बुधवार सकाळी त्यांचे पार्थिव आंबेवाडी येथील रामदेव गल्लीतील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. आंबेवाडी ग्राम पंचायतमार्फत स्मशानभूमीत स्वच्छ केली असून मंडप उभारण्यात आला आहे. ही वार्ता दोन दिवसांपूर्वी समजल्यापासून गावात शोककळा पसरली आहे. ग्राम पंचायत अध्यक्ष लक्ष्मी यळगुकर, पंचायत विकास अधिकारी व सर्व सदस्यांनी स्मशानभूमी स्वच्छ करून अंत्यसंस्कारासाठी तयारी केली आहे.

प्रत्येक गल्लीतील चौकात हुतात्मा जवानाचे श्रद्धांजलीचे फोटो लावले आहेत. अंत्ययात्रेवेळी गावातील जय जवान सैनिक संघटना गणवेशात अग्रभागी राहणार आहे. आंबेवाडी येथील सरकारी प्राथमिक मराठी, कन्नड शाळांचे विद्यार्थी, तसेच भगतसिंग हायस्कूलचे विद्यार्थी व संपूर्ण- शिक्षकवृंद या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तसेच शाळा विकास व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघटना, श्री दत्त मंदिर कमिटी, श्री घळगेश्वर मंदिर कमिटी सहभागी होणार आहे.