- धुक्यामुळे अडचण, मंत्री व आमदार अडकले ; ‘इंडिगो’ कडून गैरसोय
बेंगळूर : नवी दिल्लीहून बेळगावला येणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला सुमारे चार तासांचा मोठा विलंब झाल्याने २१ मंत्री आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. दिल्लीहून जाणारे विमान मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता बेळगावच्या सांबरा विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, हे विमान तब्बल चार तास उशिरा दुपारी १२.१५ दाखल झाले. या विलंबामुळे विमानातील प्रवासी विशेषतः मंत्री व आमदार हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीतील ताट धूर व धुक्यामुळे ही स्थिती निर्माण झाली.
शहरात आयोजित ‘मत चोरी’ विषयावरील परिषदेसाठी मंत्री व काँग्रेस आमदार दिल्लीला आले होते. त्यानंतर दावणगिरी येथे होणाऱ्या ज्येष्ठ काँग्रेस नेते शमनूर शिवशंकरप्पा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीहून बेळगावला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने ते प्रवास करणार होते. मात्र, आमदार पहाटे सुमारे चार वाजल्यापासून विमानात बसूनही दाट दुर आणि धुक्यामुळे विमानाने उड्डाण घेतले नाही. दिल्लीतील प्रतिकूल हवामानामुळे टेक – ऑफ आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते.
या विमानातून कर्नाटक सरकारमधील वरिष्ठ मंत्री एच. के. पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, सतीश जारकीहोळी, जे. जे. जॉर्ज, आनंद गड्डेवरमठ, तसवीर सायर, जी.एस. पाटील, मलिकय्या गुत्तेदार, ईश्वर खांड्रे, जे. टी. पाटील, तिपण्णा कमकनूर, बी. नागेंद्र, एम. बी. पाटील, अल्लमप्रभू आणि रेहमान खान यांच्यासह अनेक मंत्री व आमदार प्रवास करत होते. याशिवाय मंत्री शरणप्रकाश पाटील, आमदार राघवेंद्र इटनाळ, एन. एच. कोनरेड्डी, सलीम अहमद यांच्यासह सुमारे २१ हून अधिक लोकप्रतिनिधी या विमानात होते. सर्वजण दिल्लीतील विविध कार्यक्रम व बैठका आटोपून बेळगावकडे येत होते.
धुक्यामुळे ‘टेक – ऑफ’ ला उशीर झाला त्यामुळे विमान निश्चित वेळेत उड्डाण करू शकले नाही. परिणामी, प्रवाशांना विमानातच दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. दिल्लीतून सकाळी १० वाजता विमानाने उड्डाण घेतले. दुपारी १२.१५ वाजता बेळगावला पोहोचले.
बेळगाव सारख्या महत्त्वाच्या शहरासाठी विमान सेवा नियमित व वेळेत असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. दरम्यान, विविध कारणांमुळे बेळगावच्या विमानसेवांमध्ये सातत्याने अडथळे येत असल्याचे चित्र आहे. कधी हवामान, तर कधी तांत्रिक कारणे पुढे केली जात आहेत.








