• पालकमंत्री सतीश जारकीहोळी

अथणी / वार्ताहर

अथणी शहरातील शिवाजी चौक येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अथणी आणि अथणी तालुका मराठा समाज संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी बोलताना बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. “छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नव्हते. ते सर्व समाजांचे प्रेरणास्थान असून संपूर्ण देशाचा अमूल्य वारसा आहेत,” असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री जारकीहोळी यांनी दावणगेरे जिल्ह्यातील होदिगेरी येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांच्या समाधिस्थळाच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच बेळगाव येथे सुमारे १ कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला कामगार मंत्री संतोष लाड, मराठा जगद्गुरू मंजूनाथ भारती स्वामी, गच्चीन मठाचे शिवबसव स्वामी, मोटगी मठाचे प्रभु चन्नबसव स्वामी, शेट्टर मठाचे मरुळसिद्ध स्वामी, कवळगुड्डाचे सिद्धयोगी अमरेश्वर महाराज, ककमरीचे अभिनव गुरुलिंग जंगम स्वामी यांच्यासह आमदार रमेश जारकीहोळी, विक्रमसिंह सावंत, समाधान अवताडे, मारुतीराव मुळे, माजी आमदार महेश कुमठळी, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, नगराध्यक्ष शिवलीला बुटाळे, स्थायी समिती अध्यक्ष दत्ता वास्टर तसेच अनेक नेते, पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.