- आयआरएस अधिकारी आकाश चौगुले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि करिअर निवडीबाबत स्पष्टता मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमात भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी श्री. आकाश शंकर चौगुले तसेच विद्या प्रबोधिनी एज्युकेशन सर्व्हिसेस प्रा. लि. चे संचालक व आयएएस इच्छुकांचे मार्गदर्शक प्रा. राजकुमार पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक नियोजन आणि आत्मविश्वासाचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर शालेय एस. एम. सी. समितीचे चेअरमन व ज्योती कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आर. के. पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. सोनाली कंग्राळकर उपस्थित होत्या.
मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वक्त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि भविष्यातील उद्दिष्टे निश्चित करण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विषयाचे शिक्षक मनोहर करडी यांनी केले. सूत्रसंचालन विज्ञान विषयाच्या शिक्षिका किरण चलवेटकर यांनी केले. या उपक्रमामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधींबाबत सखोल माहिती मिळाली असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस निश्चित दिशा मिळाल्याचे मत पालक व शिक्षकांनी व्यक्त केले.








