• शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

येळ्ळूर / वार्ताहर

बेळगावजवळील राजहंसगड येथे शनिवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या चाऱ्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गर्लगुंजी क्रॉस–नंदीहळ्ळी रोड परिसरात ही आग लागून मोठे नुकसान झाले.

या आगीत कच्च्या भाताच्या दोन गंजी, पिंजरच्या दोन गंजी आणि करडची एक गंजी अशा एकूण पाच चाऱ्याच्या गंजी जळून खाक झाल्या. भाताच्या दोन गंजींची मळणी आज रात्री करण्याचे नियोजन होते ; मात्र या आगीत सुमारे ३० पोती भात पूर्णतः जळून नष्ट झाले.

या घटनेत राजहंसगड येथील शेतकरी प्रकाश रघुनाथ थोरवत यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जनावरांचा संपूर्ण चारा जळून गेल्याने त्यांच्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या घरी तीन म्हशी असून चाऱ्याअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांची आणि शेजारील नागरिकांची सतर्कता असल्याने शेजारी असलेल्या करडाच्या इतर चाऱ्याच्या गंजी आगीपासून वाचवण्यात यश आले.

या दुर्घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याने सरकारने सामाजिक बांधिलकी म्हणून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.