- संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला चोपले
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात एका माध्यमिक शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीनंतर गावकऱ्यांनी संबंधित मुख्याध्यापकाला जाब विचारला असता. त्याने गावकऱ्यांसमोरच कृत्याची कबुली दिल्याची माहिती मिळते.
कबुलीनंतर संतप्त ग्रामस्थांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. संतापलेल्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी आरोपीला चपलेचा हार घालण्याचा प्रयत्न केला; मात्र तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी त्यांना रोखले.
घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आरोपी शिक्षकाने “मी एका राजकीय पुढाऱ्याचा भाऊ आहे. मला राजकीय वरदहस्त आहे” अशी उर्मट भाषा वापरल्यामुळे लोकांचा संताप अधिकच भडकला. यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा गावात पसरली आहे.
घटनेमुळे बेळगुंदी परिसरात प्रचंड संताप असून, आरोपी मुख्याध्यापकावर कठोर गुन्हा नोंदवून पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळावा, अशी ग्रामस्थांकडून जोरदार मागणी होत आहे.








