बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉनच्या) वतीने होणारी श्रीकृष्ण रथयात्रा यंदा दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी बेळगाव नगरीत संपन्न होत आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी दिली. “बेळगावकरांचा उत्सव” म्हणून मान्यता पावलेल्या या रथयात्रेचे हे २८ वे वर्ष असून देशाच्या विविध भागातून येणारे हजारो भाविक या रथयात्रेत सहभागी होतात.
त्यासाठी इस्कॉन बेळगावच्या वतीने एका समितीचे आयोजन करण्यात आले असून ही समिती दोन दिवस होणारी रथयात्रा व्यवस्थित पार पाडावी यासाठी प्रयत्नशील आहे. या रथयात्रेत दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ रोजी रथयात्रा झाल्यानंतर त्या दिवशी व दि. २५ रोजी मंदिराच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या शामियान्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या रथयात्रेत इस्कॉनचळवळीतील अनेक ज्येष्ठ संन्यासी सहभागी होणार आहेत.








