बेळगाव / प्रतिनिधी

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यावतीने रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी कुस्ती मैदानात मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या जंगी कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे उपस्थित मान्यवरांच्याहस्ते रविवारी प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना वाय. पी. नाईक यांनी, मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने लाल मातीतील कुस्ती जिवंत राहावी. तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कुस्ती मैदानाला देणगीदारांनी भरीव आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. या कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती युनिव्हर्सिटी ब्ल्यू प्रेम जाधव कंग्राळी विरुध्द पंजाब केसरी गुरुजीत सिंग यांच्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर याच मैदानात महिला कुस्तींचे हे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावच्या कुस्तीप्रेमींना नवीन वर्षाच्या प्रारंभीच मोफत निकाली कुस्त्या पाहण्याचा संधी मिळाली आहे.

कुस्तीगीर संघटनेचे आधारस्तंभ आणि माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी, उपाध्यक्ष महादेव पाटील,सेक्रेटरी संतोष होनगल,खजिनदार भरमा पुणजगौडा, संचालक विनोद चौगुले, वाय. पी. नाईक, हिरालाल चव्हाण, विलास घाडी, वैभव खाडे, नंदकुमार कंग्राळकर, संजय मुतगेकर, कोमाणी कुन्नुरकर, परशुराम पाटील, सदाशिव तळवार, बसू कुपाणी व अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित सदस्यांनी संघटनेच्यावतीने सलग पंधराव्या वर्षी आयोजित करण्यात आलेले कुस्ती मैदान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.