• केडीपी बैठकीत चर्चा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील सुवर्णसौध येथे झालेल्या केडीपी बैठकीत प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील विलंब आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेवर लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बैठकीच्या प्रारंभी विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत, त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. “प्रकल्प सुरू करूनही काम थांबलेले आहे, अशा परिस्थितीत शाळांचे आणि इतर सुविधांचे विकास कसा होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्व समस्यांची सविस्तर माहिती द्यावी असे सांगितले. तर यादव यांनी मुख्यमंत्रीस्तरावर प्रश्न नेण्याचा सल्ला दिला.

जमीन संपादनाच्या कामात अधिकाऱ्यांनी अडथळे निर्माण केल्याबद्दल कागवाडचे आमदार व डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष राजू कागे यांनी नाराजी व्यक्त केली. “केंद्र सरकार मदतीस तयार आहे. अधिकाऱ्यांनी योग्य अहवाल दिल्यास आम्ही शिष्टमंडळासह केंद्र मंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पाला गती देऊ,” असे त्यांनी सांगितले.

ईएसआय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा पुढे आला असता उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी लवकरात लवकर नवीन इमारत बांधण्याची गरज व्यक्त केली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले “या प्रकल्पासाठी १५२ कोटी मंजूर आहेत. जुने रुग्णालय रिकामे केल्याशिवाय बांधकाम सुरू होऊ शकत नाही. एकदा निधी परत गेला तर पुन्हा मंजुरी मिळणे कठीण आहे.”

बैठकीला चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे व इतर अधिकारी उपस्थित होते.