• खासदार जगदीश शेट्टर यांचे निर्देश
  • स्मार्ट सिटी मिशन अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावी लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा देवी मंदिर परिसरात बेळगाव स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत चालू असलेल्या विविध प्रकल्पांची तसेच केंद्र पुरस्कृत विकास कामांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत विस्तृत चर्चा करून कामांच्या त्वरीत अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना दिल्या.

  • स्मार्ट सिटी मिशनमधील प्रगतीचा तपशीलवार आढावा :

बैठकीच्या सुरुवातीला खासदारांनी बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत मिळालेल्या निधीचा उपयोग, पूर्ण झालेली कामे आणि प्रलंबित प्रकल्पांची माहिती मागवली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ९९० कोटींच्या अनुदानातून ९३१ कोटी रुपये खर्च करत १०४ कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरित ४ कामे अद्याप सुरू आहेत. टिळकवाडीतील कला सभागृहात उभारलेल्या दुकानांच्या वाटप प्रक्रियेबाबत झालेल्या विलंबावर खासदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, “उभारलेली पायाभूत सुविधा वापरली नाही तर ती जीर्णावस्थेला येते. त्यामुळे दुकान वाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.”

  • नवीन बसस्थानक आणि तलाव सुधारणा प्रकल्पाची माहिती :

सीबीबीजवळ बांधलेल्या नवीन बसस्थानकाचे उद्घाटन झाले असले तरी जमीन महानगरपालिकेकडे हस्तांतरित न झाल्याचे समोर आले. ही प्रक्रिया अधिक विलंब न लावता पूर्ण करण्याचे निर्देशही खासदारांनी दिले. केंद्र सरकारच्या “अमृता” योजनेअंतर्गत शहरातील सात तलावांचे पुनरुज्जीवन आणि उद्यानांच्या विकासासाठी २४ कोटी रुपये खर्च होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

  • रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छता मोहिमेस वेग देण्याचे आदेश :

शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याचे निदर्शनास आणून खासदार शेट्टर यांनी तातडीने दुरुस्ती करावी असे सांगितले. पुढील काही दिवसांत बेळगावमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याने शहराची स्वच्छता आणि दुरुस्ती कामे प्राधान्याने पार पडावीत, असा त्यांनी भर दिला. घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने १३५ कोटी रुपयांचा निधी “विश्वास” योजनेअंतर्गत २०२३ मध्ये मंजूर केला असून, या कामाचा वेग समाधानकारक नसल्याने त्यांनी कारणमीमांसा मागितली. काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

  • एसटीपी प्रकल्प व जमीन संपादनाची मागणी :

बेळगावजवळ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याबाबत झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाने फाइल मंजूर केली असून शासन आदेश येताच प्रक्रिया सुरू केली जाईल. शेतकऱ्यांच्या जमीन संपादनासंबंधी आवश्यक निधीची तरतूद करण्याबाबतही चर्चा झाली.

  • कामे लवकर पूर्ण करण्याचे खासदारांचे निर्देश :

बैठकीच्या शेवटी खासदार शेट्टर यांनी स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत प्रलंबित असलेल्या सर्व कामांना प्राधान्य देऊन त्यांची तातडीने पूर्तता करावी असे अधिकाऱ्यांना बजावले. “जनतेचे पैसे योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी खर्च झाले पाहिजेत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

या बैठकीस महानगरपालिका आयुक्त व स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती शुभा, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.