बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावचा सर्वांगीण विकास आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगावतर्फे आयोजित १५ वी रोटरी हाफ मॅरेथॉन अत्यंत उत्साहात पार पडली. रविवारी सकाळी लिंगराज महाविद्यालयाच्या प्रांगणातून मॅरेथॉनचा शुभारंभ झाला. शहरातील ज्योती कॉलेज रोड, कॅम्प परिसर, सावगाव रोड अशा प्रमुख मार्गांवरून ही मॅरेथॉन झाली. नेहमीप्रमाणे यंदाही हजारो धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी आरोग्य, फिटनेस आणि खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी कारागृह विभागातील कर्मचारी उमा म्हणाल्या, “बेळगावमध्ये प्रथमच मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा आनंद आहे. जिंकणे किंवा हरणे यापेक्षा सहभाग अधिक महत्त्वाचा असून शरीर तंदुरुस्त राहावे, हीच खरी प्रेरणा आहे. त्यामुळे तरुणांनी खेळात सक्रिय व्हायला हवे.” आजच्या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि मॅरेथॉन हा आरोग्याकडे जाणारा सोपा मार्ग आहे.” असे त्यांनी सांगितले.
तर अलदाळ (ता. हुक्केरी) येथील सहभागी भैरू नायक मॅरेथॉनमधील अनुभवाबाबत बोलताना म्हणाले, “मॅरेथॉनमुळे शरीर तंदुरुस्त राहते तसेच ध्येय साध्य करण्याची क्षमता वाढते. अशा मॅरेथॉन केवळ शहरातच नव्हे तर गावांमध्येही आयोजित केल्या पाहिजेत.”
२०१८ पासून रोटरी क्लब आयोजित मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असलेल्या साईश्री पाटील यांनी यंदा त्यांच्या ३६व्या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी सांगितले की, “मी आजवर १० पदके जिंकली आहेत. बेळगावमध्ये धावण्याचा अनुभव नेहमीच वेगळा असतो. अशा स्पर्धा सातत्याने होत राहाव्यात.”
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील धावपटूंनी २१ किमी हाफ मॅरेथॉनसह १० किमी, ५ किमी आणि ३ किमी फन रनमध्ये भाग घेतला. मोठ्या संख्येने युवक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि फिटनेसप्रेमींनी सहभागी होऊन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विजेत्यांना सोन्याच्या नाण्यांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
मॅरेथॉनचे संपूर्ण आयोजन अत्यंत सुयोग्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. मार्गावर पाण्याचे पॉइंट्स, मेडिकल स्टॉल, स्वयंसेवक, सुरक्षा व्यवस्था याची उत्कृष्ट मांडणी दिसून आली. सहभागी धावपटूंनीही आयोजनाचे जोरदार कौतुक केले. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष शशिकांत नायक, तसेच लोकेश होंगल, वैशाली सगरे, सचिन कुलगोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
यावेळी सीपीआय विजय शिन्नूर, मार्केटचे पीएसआय विठ्ठल, कीर्ती टोपण्णावर यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारीही मॅरेथॉन उत्साहाने सहभागी झाले होते.
रोटरी हाफ मॅरेथॉनमुळे बेळगावमध्ये पुन्हा एकदा फिटनेस, आरोग्य, एकता आणि क्रीडावृत्तीचा प्रत्यय आला. शहरातील नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, अशा उपक्रमांची परंपरा पुढील काळात अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.








