बेळगाव / प्रतिनिधी

अनगोळ येथील दिलीप दामले हायस्कूलमध्ये बेळगाव शहरातील प्रथम भाषा मराठी शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष दिगंबर राऊळ, शिक्षण संयोजिका सविता तिगडी, सी.आर.पी. एस. व्ही. सोनटक्की, मराठी फोरमचे अध्यक्ष संजय नरेवाडकर, नोडल अधिकारी प्रिया सायनेकर, प्रभारी मुख्याध्यापक एच. बी. पाटील तसेच विषय मार्गदर्शक म्हणून ठळकवाडी हायस्कूलचे सहशिक्षक सी.वाय. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रार्थना गीताने सुरुवात झाली. संजय नरेवाडकर यांनी प्रास्ताविक सादर केले. शिक्षण संयोजिका सविता तिगडी यांनी एसएसएलसी परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी आखता येणाऱ्या अभ्यासक्रम व कार्ययोजनांची माहिती दिली. तसेच आप्पासाहेब गुरव आणि दिगंबर राऊळ यांनीही शिक्षकांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या. शहरातील मराठी विषयाचे सर्व शिक्षक या कार्यशाळेला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधुरी कुजी यांनी तर आभारप्रदर्शन शामल पाटील यांनी केले.