- वनविभाग सतर्क
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरालगतच्या भूतरामनहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा लघु प्राणीसंग्रहालयात तब्बल २८ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकााच प्रकारच्या प्राण्यांचे इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब ठरली असून प्राणीसंग्रहालयातील वातावरण चिंताजनक बनले आहे.
वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हरणांचा मृत्यू जिवाणूजन्य संसर्गामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला आठ हरणे मृत अवस्थेत आढळल्यानंतर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र नंतर मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढत गेला.
घटनेची माहिती मिळताच वनमंत्री ईश्वर खंडरे यांनी तात्काळ सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत हरणांच्या मरणोत्तर तपासणीतून मिळालेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, नेमका कोणता जीवाणू किंवा संसर्ग प्राणघातक ठरला याबाबत पुढील तपास सुरू आहे.
याच अनुषंगाने म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथील तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम बेळगाव येथे दाखल होत आहे. ते परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना मार्गदर्शन करतील.
एसीएफ नागराज यांनी सांगितले की, सद्यस्थितीत इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. तरीदेखील संपूर्ण प्राणीसंग्रहालय सतर्कतेच्या वातावरणात असून उर्वरित प्राण्यांची काळजी घेणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान बनले आहे.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी पवन करनिंग यांच्याकडून वेळेवर आणि पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.








