बेळगाव / प्रतिनिधी

टिळकवाडी पोलिसांनी लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीतील दोघांना अटक करून त्यांच्याकडून मौल्यवान ऐवज जप्त करण्यात यश मिळवले आहे. नागराज बसप्पा हरणशिकारी (वय १९) आणि अमन दीपक राऊत (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

चेन स्नॅचिंगची तक्रार टिळकवाडी पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासाच्या आधारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी एकूण  १०,२५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ९,१५,००० रुपये किमतीचे ८०.३६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५०,००० रुपये किमतीची एक दुचाकी, अंदाजे ६०,००० रुपये किमतीचे सुमारे २०० मोटरसायकलींचे पार्ट्स आणि साहित्य आदींचा समावेश आहे. चौकशीत आरोपींनी शहरातील विविध भागांतून दागिने चोरल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत टिळकवाडी पोलिस निरीक्षक परशुराम पूजेरी, पीएसआय विश्वनाथ घंटामठ, प्रभाकर डॉली , आणि कर्मचारी महेश पाटील, एस. एम. करलिंगण्णावर, लाडजीसाबा मुलतानी, नागेंद्र तळवार आणि सतीश गिरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.