- ३३ जणांना अटक ; लाखोंची फसवणूक उघड
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर पोलिसांनी ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर संयुक्त कारवाई करत ३३ जणांना अटक केली आहे. या छाप्यात पोलिसांनी ३७ लॅपटॉप, ३७ मोबाईल फोन आणि महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
ही कारवाई माळा मारुती पोलिस ठाण्याचे सीपीआय गड्डेकर आणि एपीएमसी पोलिस ठाण्याचे सीपीआय उस्मान अवटी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी करण्यात आली. पोलिसांनी कुमार हॉल, बॉक्साईट रोड परिसरातील एका अनधिकृत कॉल सेंटरवर छापा टाकून ही मोठी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर परदेशातील नागरिकांना फोन करून ऑनलाईन ट्रेडिंग, गुंतवणूक आणि मोबाईल खरेदीच्या नावाखाली फसवत होते. प्राथमिक चौकशीत असे उघड झाले आहे की, या टोळीत ३३ जणांपैकी ११ जण अमेरिकन नागरिकांना फसवणुकीसाठी संपर्क साधत होते, तर उर्वरित जण वेगवेगळ्या सहाय्यक भूमिकेत होते. आरोपींचा संबंध आसाम, नागालँड, राजस्थान आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांशी आहे.
पोलिस आयुक्त भूषण भोरसे यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या तपासात हजारो कॉल रेकॉर्ड्स आणि फसवणुकीचे पुरावे सापडले आहेत. या प्रकरणाचा तपास सखोलपणे सुरू असून, सायबर फसवणुकीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
या छाप्यात माळा मारुती आणि एपीएमसी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.








