• शंभरहून अधिक सायलेंसर नष्ट

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने मोठी मोहीम राबवली असून, १०० पेक्षा जास्त कर्कश आणि बेकायदेशीर सायलेंसर बुलडोझरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.

वाहतूक पोलिसांनी शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या सुधारित सायलेंसरविरोधात ही कारवाई केली. अनधिकृत सायलेंसरमुळे निर्माण होणारे ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणीय हानी लक्षात घेऊन पोलिसांनी ही कठोर पावले उचलली.

ही मोहीम वाहतूक विभागाचे एसीपी शिवाजीराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले सर्व सायलेंसर एकत्र करून बुलडोझरच्या सहाय्याने पूर्णतः नष्ट करण्यात आले. यावेळी विभागातील सीपीआय, पीएसआय आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, अशा प्रकारचे कर्कश सायलेंसर पुन्हा वापरताना कोणी आढळल्यास त्यांच्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी ही मोहीम शहरात पुढेही सुरू राहणार असून, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.