बेळगाव / प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मंडोळी हायस्कूलमधील विद्यार्थी कुमार पार्थ उत्तम कणबरकर याने राज्यस्तरीय मिनी ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रभावी कामगिरी प्रदर्शन करत थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदकावर आपला ठसा उमटवला.

यापूर्वी बेळगाव जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आयोजित 14 वर्षाखालील गटातील जिल्हास्तरीय खेळांमध्ये पार्थने थाळीफेक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली होती. या यशाच्या जोरावर त्याने बेंगळुरू येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उतरून प्रभावी खेळ सादर केला.

स्पर्धेत मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेचा गौरव वाढला असून क्रीडा शिक्षक एस. एन. बेळगुंदकर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थांनी पार्थचे हार्दिक अभिनंदन केले. त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.