बेळगाव / प्रतिनिधी

ऊस दराच्या प्रश्नावर वाढत्या असंतोषामुळे गुरुवारी राज्याचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या खास आदेशानुसार अचानक बेळगाव गाठले. हुबळीहून बिना गाजावाजा थेट बेळगावात पोहोचताच त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि साखर आयुक्तांची एका खाजगी ठिकाणी तातडीची बैठक बोलावली.

शेतकरी संघटनांचा संभाव्य विरोध आणि मार्ग अडवण्याच्या इशाऱ्यामुळे हा दौरा पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला होता. बैठकीदरम्यान पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांशी दूरध्वनीवर सविस्तर चर्चा केल्याचेही निष्पन्न झाले.

बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, उद्या मुख्यमंत्री बेंगळुरू येथे सर्व साखर कारखानदारांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत निश्चित होणाऱ्या निर्णयांच्या आधारावर ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकार गंभीर पावले उचलेल. शेतकऱ्यांचे आंदोलन न्याय्य असून त्यावर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे, असे त्यांनी नमूद केले.

‘एफआरपी’ निश्चितीवरून लक्ष्य केले जात असल्याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, एफआरपीचा दर केंद्र सरकार ठरवते, तरीही राज्यातील साखर मंत्र्यावर टीका केली जाते. देशाचे साखरमंत्री आपल्या राज्याचे असूनही त्यांच्या भूमिकेवर कुणी प्रकाश टाकत नाही, असे सांगत त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर थेट टीका केली.

शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे सांगत पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह थेट गुरलापूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.