बेळगाव / प्रतिनिधी

अगरबत्ती व्यवसाय सुरू करून चांगला नफा मिळेल, अशा आमिषाने अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर या मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणात कोळेकर याने महिलांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. त्यानंतर ना व्यवसाय सुरू ठेवला, ना पैसे परत दिले, अशा तक्रारींचा भडिमार पोलिसांकडे झाला होता.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला होता. आरोपी फरार होता, मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी तपास करत अखेर त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून आणखी माहिती मिळवून त्याने फसवलेल्या रकमेचा व इतर सहभागींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा आकर्षक व्यावसायिक योजनांमध्ये पैसे गुंतवताना पूर्ण खात्री करूनच व्यवहार करावेत.