बेळगाव / प्रतिनिधी
जय किसान भाजी मार्केट यांनी दाखल केलेल्या दोन्ही याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की या प्रकरणात अर्जदारांनी प्रथम कर्नाटक राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (KAT) जाणे आवश्यक होते.
या निर्णयानंतर जय किसान भाजी मार्केट असोसिएशनकडे आता कर्नाटक राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण (KAT) समोर दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना राजू टोप्पन्नावर म्हणाले, “न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी वास्तव स्वीकारावे. आता आंदोलन मागे घेऊन APMC परिसरात शांततेत आणि सहकार्याने व्यवसाय सुरू ठेवावा.” त्यांनी पुढे सांगितले, “जर जय किसान असोसिएशनने KAT कडे दाद मागितली, तरी आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.”
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच पुढील भूमिका निश्चित केली जाईल, अशी माहिती संबंधित व्यापाऱ्यांकडून मिळाली आहे.








