खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याजवळील गवळी गावातील शेतकरी प्रकाश कृष्णा गुरव (वय ५५) यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
जखमी शेतकऱ्याला तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी बेळगाव शासकीय जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले. नंतर आमदारांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना केएलई रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले.
त्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्वरित केएलई रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्याची प्रकृती विचारपूस केली. त्यांनी प्रकाश गुरव यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला, गावकऱ्यांकडून घटनाक्रमाची माहिती घेतली आणि त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.







