- घटस्फोटानंतरही देत होता धमक्या : गळा चिरून केली हत्या
सौंदत्ती / वार्ताहर
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सौंदत्ती येथील रामसाईट भागात घडली असून, मृत महिलेचे नाव काशम्मा नेल्लिकट्टी असे आहे. आरोपी पती संतोष कांबळे हा पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.
याबाबत घटनस्थळावरून प्राप्त माहितीनुसार, सुमारे तेरा वर्षांपूर्वी संतोष आणि काशम्मा यांचा प्रेमविवाह झाला होता. काशम्मा बस कंडक्टर म्हणून नोकरी करत होती. मात्र, संतोष याला तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने तो तिच्यावर नेहमीच मानसिक आणि शारीरिक छळ करत असे. या अत्याचारांना कंटाळून काशम्मा काही महिन्यांपूर्वी माहेरी परतली होती आणि नंतर तिने सौंदत्ती डेपोमध्ये बदली करून घेतली होती.
यानंतर तिने बैलहोंगल न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, आणि न्यायालयाने ५ एप्रिल २०२५ रोजी घटस्फोट मंजूर केला होता. तरी देखील संतोष तिला सतत फोनवरून शिवीगाळ करून धमक्या देत होता.
दि. १३ ऑक्टोबरच्या रात्रीच्या सुमारास तो काशम्माच्या भाडोत्री घरात गेला. वाद वाढल्याने संतापाच्या भरात त्याने तिचा गळा चिरून आणि पोटात वार करून तिची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर संतोष घटनास्थळावरून फरार झाला.
तीन दिवसांनंतर घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. सध्या सौंदत्ती पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, फरार आरोपी संतोष कांबळेच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. या घटनेने संपूर्ण सौंदत्ती शहरात शोककळा पसरली आहे.