• एका आठवड्यात रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील नागरिकांनी वारंवार केलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करत खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी टिळकवाडीनजीक रेल्वे गेट क्रमांक ३ (एल.सी. ३८१) वरील उड्डाणपुलाची पाहणी केली. रस्त्यावरील खड्डे व खालावलेली स्थिती पाहून शेट्टर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री. कोळेकर यांना तातडीने दुरुस्ती सुरू करून एक आठवड्याच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

हा उड्डाणपूल नैऋत्य रेल्वे विभागाने बांधलेला असून, सध्या त्याची देखभाल जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. पाहणी दरम्यान रेल्वेचे सहाय्यक अभियंता श्री. मायनका यांनी पुलाच्या तांत्रिक बाबींबाबत माहिती दिली.

खासदारांच्या पाहणीनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत लवकरच रस्ता दुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.