बेळगाव / प्रतिनिधी

म. ए. युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी कन्नड संघटनेच्या एका म्होरक्याच्या विरोधात सोशल मीडियावर विधान केल्याने त्यांच्या विरोधात मार्केट पोलीस स्थानकात मंगळवार दि. १४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीष रुद्राप्पा शिग्गीहळ्ळी रा. अशोकनगर याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत शेळके यांना ताब्यात घेतले होते. सायंकाळी पोलीस स्थानकातच जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. सोमवार दि. १३ रोजी एका कन्नड संघटनेचा बेंगळूर येथील म्होरक्या बेळगावात आला होता. त्याने म. ए. समिती विरोधात गरळ ओकल्याने शुभम शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.

मात्र शेळके यांची ही प्रतिक्रिया कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. कारण शेळके यांनी अत्यंत शेलक्या भाषेत आपले परखड मत व्यक्त केले होते. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहिल्यानंतर तीळपापड झालेल्या कन्नडिगांनी थयथयाट करण्यास सुरुवात केली. शुभम शेळके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी खबरदारी म्हणून मंगळवारी सकाळीच शेळके यांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणून बसविले तर गिरीष शिग्गीहाळ्ळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सायंकाळी जामिनावर त्यांची पोलीस स्थानकातून सुटका करण्यात आली.