• बिजगर्णी – बेळवट्टी मार्गावर झाला होता अपघात

बेळगाव / प्रतिनिधी

दारूच्या नशेत गाडी चालवल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केली आहे.

ही घटना १७ ऑगस्ट २०२५ रोजी बिजगर्णी-बेळवट्टी मार्गावरील कावळेवाडी क्रॉसजवळ घडली. सागर पांडुरंग चौगुले यांनी या घटनेची तक्रार बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती.

तपासादरम्यान पोलिस निरीक्षक नागनगौडा गौडर यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले की, जुनैद मेहबूब राजगोळी (वय ३१, रा. वडगाव) हा चालक दारूच्या नशेत कार चालवत होता. त्याचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, आरएफएसएल अहवालातून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दारूच्या नशेत असलेल्या जुनैदने टाटा व्हिस्टा कारद्वारे बिजगर्णीहून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सतीश विष्णू मोहिते (वय ३७) आणि रोहिणी रामलिंग चौगुले (वय २०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मी रामलिंगा चौगुले (वय ४५) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपी जुनैद मेहबूब राजगोळी याला १० ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.