निपाणी / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी शहरातील जुन्या पीबी रोडवर टायरच्या दुकानाला लागलेल्या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले.
नगरपरिषद कार्यालयासमोरील उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीचे टायर विक्री आणि पंक्चर दुकान अचानक पेटल्याने काही वेळातच संपूर्ण दुकान जळून खाक झाले. आग लागली तेव्हा दुकान बंद होते. मालक उत्तम जाधव हे घरी गेल्यानंतर काही वेळातच परिसरातून धुराचे लोट उठताना दिसल्याने नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच दुकानातील टायर, उपकरणे आणि साहित्य जळून नुकसान झाले होते. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.