- इंद्रजित देशमुख : बेळगाव येथे ‘उमंग २०२५’ कार्यक्रमास प्रतिसाद
बेळगाव / प्रतिनिधी
“माणसाच्या आयुष्यात सत्ता, संपत्ती आणि मान हे सर्व क्षणभंगुर असतात. पण दुसऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे — हाच जगण्याचा खरा अर्थ आणि प्रेरणास्त्रोत आहे,” असे प्रतिपादन सांगली येथील प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी केले.
ते संजीवनी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘उमंग २०२५’ या कार्यक्रमात बोलत होते. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून बेळगावातील कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे मंगळवारी हा कार्यक्रम झाला.
देशमुख म्हणाले, “प्रशासनात काम करताना अनेक अनुभव आले. जीवनात समाधान आणि शांती मिळवायची असल्यास इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणे गरजेचे आहे. संजीवनी फाउंडेशनचा उपक्रम म्हणजे जीवनाचा उत्सवच आहे. संस्था नागरिकांची सेवा अशाच जोमाने करत राहो,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संजीवनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “दरवर्षी १ ऑक्टोबरला कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, यंदा दसरा सणामुळे तो काही दिवस उशिरा झाला. नृत्य आणि गायन स्पर्धांना ऑनलाईन स्वरूपात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षापासून या स्पर्धा प्रत्यक्ष फाउंडेशनच्या ठिकाणी घेण्यात येतील.” फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता देगीनहाळ यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून चालू असलेल्या सेवाकार्याची त्यांनी माहिती दिली. “संजीवनी हे केवळ काळजी केंद्र नसून समाजातील दुर्बल घटकांसाठी आधारस्थान आहे. विद्या आधार, रुग्णांना आधार अशा उपक्रमांद्वारे गरजूंची मदत केली जाते,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शंकर पाटील, सुनिता पाटणकर, आणि स्मिता पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.



सौ. स्मिता बाळासाहेब पाटील सुळगा (हिं.) यांनी सत्कारानंतर कृतज्ञता व्यक्त करत प्रेरणादायी विचार मांडले. “जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे. ८४ लक्ष योनीनंतर मनुष्यजन्म प्राप्त होतो त्याचे सार्थक करण्यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे,” असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित स्वरचित कविता सादर करून उपस्थितांना भावुक केले.

- ज्येष्ठांचा कलागौरव :
कार्यक्रमात झालेल्या गायन स्पर्धेत युष्णा मदुर यांनी प्रथम, किशोर काकडे यांनी द्वितीय, तर श्रीनिवास नाईक यांनी तृतीय क्रमांक मिळविला. नृत्य स्पर्धेत राजश्री हावळ प्रथम, उषा गंगवानी द्वितीय आणि प्रेमा उपाध्याय तृतीय क्रमांक प्राप्त केला. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपली कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सभागृहात उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात ज्येष्ठांच्या सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद दिला.