• विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी तीन विशेष सत्रांचे आयोजन

बेळगाव / प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे दोन दिवसांची बौद्धिक कौशल्यविकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षकांसाठी स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील स्मार्ट चॅम्प्स संस्थेचे सर्वेसर्वा आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सधारक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय वक्ते श्री. रवींद्र नाईक आणि त्यांच्या पत्नी सौ. कविता नाईक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठीच्या सत्रामध्ये एकाग्रता, निरीक्षण, सर्जनशीलता, भाषिक कौशल्य, समस्यांचे निराकरण आणि इतर सॉफ्ट स्किल्स विकसित करणारे बौद्धिक खेळ व कोडी घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत या उपक्रमांचा आनंद घेतला तसेच शिकण्याचा नवा अनुभव मिळवला.

पालकांसाठीच्या कार्यशाळेमध्ये मुलांचा बौद्धिक आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठीच्या आधुनिक सिद्धांतांची माहिती देण्यात आली. पालकांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन त्यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी या संकल्पनांचा कसा उपयोग होऊ शकतो हे समजून घेतले. बौद्धिक खेळांमधून पालकांनीही प्रत्यक्ष अनुभव घेतला.

शिक्षकांसाठी आयोजित सत्रात डॉ. हॉवर्ड गार्डनर यांच्या “बहुविध बुद्धिमत्ता” (Multiple Intelligences) या संकल्पनेचा परिचय देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी या संकल्पनेचा वापर कसा करता येईल याची माहिती पझल्स आणि सर्जनशील खेळांच्या माध्यमातून दिली गेली. शिक्षकांनीही या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

शेवटी काही विद्यार्थ्यांच्या विविध बौद्धिक क्षमतांचे निरीक्षण करून त्याबाबतची माहिती पालकांना देण्यात आली. या कार्यशाळेमुळे मुलांच्या प्रगतीला निश्चितच नवा वेग मिळेल, असा विश्वास पालकांनी व्यक्त केला.