- देशात सौहार्दाचा संदेश ; बेळगावात तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व उत्साहात दौड
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावात श्री दुर्गामाता दौडच्या तिसऱ्या दिवशी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे मुस्लिम बांधवांनी स्वागत केले आणि सौहार्दाचा संदेश दिला.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी श्री दुर्गामाता दौडची सुरुवात श्री चंद्रघंटादेवीच्या पूजेने करण्यात आली. श्री दुर्गामाता दौड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू झाली. पुढे काँग्रेस रोड, ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडेंट रोड, हाय स्ट्रीट, वेस्ट स्ट्रीट, हाईट, कोंडप्पा स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिश मार्केट, तेलुगू कॉलनी, के.टी. पुजारी श्री दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड आदी मार्गांवरून दौड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात आली असता, मुस्लिम बांधवांनी श्री दुर्गामाता दौडचे भव्य स्वागत केले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना एमएलआयआरसीच्या एका अधिकाऱ्याने, कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी सदस्य साजिद शेख यांनी श्री दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी केलेल्या भव्य तयारीबद्दल आनंद व्यक्त केला. मुस्लिम समुदायाने श्री दुर्गामाता दौडाचे स्वागत केल्याने देशात सौहार्दाचा संदेश गेला आहे. तसेच पहिल्यांदाच श्री दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
साजिद शेख म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुस्लिम समुदाय, जंगू कुटुंब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅंटोन्मेंट बोर्ड परिसरात दुर्गामाता दौडचे स्वागत केले. म्हैसूर इतकाच भव्य दसरा बेळगावात आयोजित केला जातो. दुर्गामाता सर्वांचे कष्ट दूर करो आणि सर्वांना सुख आणि शांती देवो अशी प्रार्थना त्यांनी केली.
खानापूर रोडमार्गे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सर्कल, जत्ती मठ येथे तिसऱ्या दिवशीच्या दौडीची सांगता झाली.