बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) परिसरातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये १६८/२६ कर्नाटक बटालियन एनसीसी युनिटचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचे उद्घाटन एमएलआयआरसी कमांडंट व एपीएसचे अध्यक्ष ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून एनसीसी ग्रुप मुख्यालय, बेळगावचे कर्नल मोहन नाईक, २६ कर्नाटक बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील डागर आणि एपीएसचे स्टाफ ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अरुण मॅथ्यू उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुपिंदर कौर चहल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्ती, शिस्त आणि एकतेचा संदेश देणारा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने एनसीसी युनिटमध्ये सहभाग नोंदवला असून पुढील काळात याचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.
आपल्या भाषणात ब्रिगेडियर मुखर्जी यांनी युवा एनसीसी कॅडेट्सना शिस्त, समर्पण आणि राष्ट्रसेवेची मूल्ये अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच नेतृत्वगुण, चारित्र्यनिर्मिती आणि समाजसेवा यामध्ये एनसीसीचे महत्त्व अधोरेखित केले.
आर्मी पब्लिक स्कूलमधील एनसीसी युनिटची स्थापना हा शाळेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला असून विद्यार्थ्यांना साहसी उपक्रम, नेतृत्व विकास आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागासाठी नवा मार्ग खुला झाला आहे.