बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव टिळकवाडी येथील मंगळवार पेठेत मालमत्तेच्या वादातून झालेल्या गीता गवळी यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपींना टिळकवाडी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. यश गणेश दावले उर्फ गवळी (वय २५), आदित्य गणेश दावले उर्फ गवळी (वय २०) आणि गणेशची पत्नी (नाव जाहीर नाही) तिघेही राहणार गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या घटनेनंतर मुख्य आरोपी गणेश लक्ष्मण दावले उर्फ गवळी (वय ६०) याला तात्काळ अटक झाली होती. परंतु त्याची पत्नी आणि दोन्ही मुलगे फरार होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पोलिस तपासानंतर आज तिघांनाही अटक करण्यात आली.
१० सप्टेंबर २०२५ रोजी टिळकवाडीतील मंगळवार पेठेत मालमत्तेच्या वादातून धारदार शस्त्राने गीता गवळी यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर टिळकवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. आरोपींना शोधून काढण्यात यशस्वी ठरलेल्या टिळकवाडी पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाचे पोलिस आयुक्त व उपायुक्तांनी कौतुक केले आहे.