बेळगाव / प्रतिनिधी
२२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जातनिहाय जनगणनेपूर्वी मराठा समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी युवा नेते किरण जाधव यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी बेळगावमधील नवहिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी तसेच मराठा सहकारी बँक यांना भेट देऊन तेथील चेअरमन व संचालक मंडळाशी चर्चा केली आणि नोंदी कशा पद्धतीने कराव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मराठा सहकारी बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील व संचालक दिगंबर पवार यांनी संचालक मंडळासह जाधव यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी बँकेच्या सभासद, ग्राहक आणि समाजातील हितचिंतकांना आवाहन केले की, जनगणना फॉर्म भरताना धर्म: हिंदू, जात: मराठा, पोटजात: कुणबी आणि भाषा: मराठी असे स्पष्टपणे नमूद करावे, जेणेकरून समाजाला याचा शैक्षणिक व शासकीय योजनांमधील लाभ भविष्यात मिळेल.
बँकेच्या संचालिका रेणू किल्लेकर यांनीही मराठा समाजातील नागरिकांनी जनगणनेच्या वेळी नेत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार अचूक माहिती नोंदवावी, असे सांगितले.
नवहिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनीही हेच मत व्यक्त करत, जातनिहाय जनगणना करताना धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी आणि मातृभाषा मराठी अशी माहिती नोंदवणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
किरण जाधव हे शहरातील विविध संघटना व संस्थांना भेटी देऊन त्यांचे पदाधिकारी व संचालकांना जातनिहाय जनगणनेदरम्यान योग्य नोंदीसाठी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.