बेळगाव / प्रतिनिधी

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी जाहीर केले की, येत्या ३१ डिसेंबरपूर्वी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा दिला जाईल.

चिक्कोडी जिल्हा संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी शहरात भेट घेऊन आपली मागणी मांडली. यावेळी त्या म्हणाल्या, “सरकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करणे अपरिहार्य आहे.”

सरकारने आधीच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी आणि शासकीय योजना योग्यरित्या राबवण्यासाठी जिल्हा विभाजन गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“मी वैयक्तिकरित्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देते. सरकारने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्कोडी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा, अशी माझी ठाम भूमिका आहे,” असेही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नमूद केले.

यावेळी चिक्कोडी जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रा. एस. वाय. हांजी, सचिव रुद्रप्पा संगाप्पागोळ, संजय पाटील, संतोष चिंगळे, विठ्ठल स्वामी, बासू साबणे, सुरेश बायकुडे, काशिनाथ गिरजावगोळ, सुरेश तळवार, अरविंद मदार, जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.