बेळगाव / प्रतिनिधी

अनगोळ चौथे रेल्वेगेट येथे रोड अंडरब्रिजच्या कामाचा सोमवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. २६.०५ कोटी रुपये खर्च करून प्रशस्त असा अंडरब्रिज बांधला जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. यामुळे बेळगाव शहर व अनगोळचा संपर्क वाढविणे भविष्यात अधिक सुलभ होणार आहे. रेल्वेमंत्री व्ही. सोमण्णा यांच्यासोबत खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. खानापूर येथील स्टेशन यार्ड येथे रोड अंडरब्रिज, प्लॅटफॉर्म शेल्टर, वेटिंग रूम, टॉयलेट यासारख्या सुविधांसाठी ११ कोटी रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंत्राटदार, अधिकाऱ्यांना बांधकामाचा दर्जा राखण्याची सूचना केली. याबरोबरच त्यांनी आळणावर व लोंढा या रेल्वेस्थानकांचीही पाहणी केली.