खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील हुळंद गावात अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकरी वासुदेव नारायण गावडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेळगाव येथील रुग्णालयाला भेट दिली.

या हल्ल्यात गावडे यांच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी त्यांना बेळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भेटीवेळी आमदारांनी डॉक्टरांशी चर्चा करून सुरू असलेल्या उपचारांची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी आमदारांनी गावडे यांच्या कुटुंबाला धीर देत शासनस्तरावर शक्य ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.