खानापूर / प्रतिनिधी
मातृभाषेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच दुर्गम भागातील इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
जांबोटी सी.आर.पी मधील आमगाव, आमटे, चापोली, चिरेखानी,गवसे, हब्बनट्टी, जांबोटी, कालमनी, ओलमणी, वडगाव, विजयनगर तर कणकुंबी सी.आर.पी मधील बेटणे, हुळंद, पारवाड,चिखले,चोर्ला, मान, कणकुंबी, चिगुळे, हंदीकोपवाडा या शाळांना आणि बैलूर सी.आर.पी मधील तळवडे, गोल्याळी, तीर्थकुंडे, बैलूर, मोरब, तोराळी, सोनारवाडी कौलापूर, बेटगिरी, गवळीवाडा, उचवडे, देवाचीहट्टी, कुसमळी या शाळेमध्ये उपक्रम राबविण्यात आला.

जांबोटी केंद्र शाळा येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी प्राथमिक शाळा जांबोटीचे एसडीएमसी अध्यक्ष महेश जांबोटकर होते, यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व याबाबत आपले विचार व्यक्त केले.जर सीमाभागामध्ये मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळा या टिकल्या पाहिजेत आणि त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. असे सांगितले. तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अपुऱ्या सोयी सुविधा असून देखील सदर शाळांमधील शिक्षक विद्यादानाचे महत्त्वाचे कार्य करत असून आपली सेवा तळमळीने करीत आहेत त्यामुळे त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सीआरपी अधिकारी विठोबा दळवी यांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक केले यावेळी पी.एस.गुरव, भरणकर सर,श्रीमती देवगेकर,रमेश गावडे वृषाली घाडी, विभागातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, एसडीएमसी उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश गावकर यांनी केले.
कणकुंबी मराठी प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण समिती नेते किरण गावडे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शहाजीत मुल्ला, बिर्जे सर , युवा समिती उपाध्यक्ष राजू कदम सरचिटणीस श्रीकांत कदम सुरज कुडूचकर आदी सहशिक्षक उपस्थित होते. बैलूर विभागाचे साहित्य वितरण कुसमळी मराठी प्राथमिक शाळा येथे झाले, यावेळी युवा समितीचे पदाधिकारी प्रल्हाद पाटील, सी.आर.पी अधिकारी एम.के.पाटील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.