खानापूर / प्रतिनिधी

जांबोटी–खानापूर मुख्य रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी नागुर्डावाडा गाव हद्दीतील मोदेकोप क्रॉसजवळ ही दुर्दैवी घटना घडली होती. शिवम संजय कुंभार (वय १७, रा. नागुर्डावाडा, ता. खानापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत घटना स्थळावरून प्राप्त माहितीनुसार, सोमवार (दि. १७) नोव्हेंबर रोजी शिवम हा नेहमीप्रमाणे सकाळी जांबोटीहून खानापूरकडे पायी जात असताना नागुर्डावाडा गाव हद्दीतील मोदेकोप क्रॉसजवळ जांबोटीच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने अतिवेगात शिवमला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर वाहनासह पसार झाला.

या धडकेत शिवमच्या डोक्याला तसेच पाठीच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापती झाल्या. स्थानिकांनी तात्काळ मदत करून त्याला खानापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बेळगावातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सर्व प्रयत्नांनंतरही मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बेळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. अहवालानंतर रात्री शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत. खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा क्रमांक २४३/२०२५ नोंद करण्यात आला आहे. आरोपीवर भादंवि कलम १३४, २८१, १८७ तसेच मोटार वाहन कायदा कलम १२५(९) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पीएसआय एम. बी. बिरादार करीत आहेत.