• इदलहोंड येथील घटना

खानापूर / प्रतिनिधी

पाय घसरून शेतातील विहिरीत पडल्यामुळे युवकाचा मृत्यू झाला. इदलहोंड (ता. खानापूर) येथे आज गुरुवारी ही दुर्दैवी घटना घडली. दिग्विजय  मनोहर जाधव (वय ३६) असे मृत युवकाचे नाव आहे.त्याच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा, आई वडील व एक विवाहित मोठा भाऊ, तीन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. सदर युवक पिसेदेव सोसायटीच्या गर्लगुंजी शाखेत लिपिक म्हणून सेवा बजावत होता.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, सकाळच्या सुमारास दिग्विजय शेतात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. परंतु बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी शेतात जाऊन शोध घेतला. यावेळी विहिरीच्या काठावर त्याचे चप्पल आढळून आले. त्यामुळे घरच्यांना दिग्विजय विहिरीत पडल्याचा संशय आला आणि त्यांनी तातडीने खानापूर अग्निशमन दलाला माहिती दिली.

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, सुमारे दोन ते तीन तास शर्थीचे प्रयत्न करून दिग्विजयचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून, तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात येणार आहे.

या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी खानापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.