- सैन्य भरतीची तयारी करताना दुर्घटना : शोधमोहीम अद्यापही सुरूचं
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीत पोहण्यासाठी गेलेला प्रथमेश रवींद्र पाटील (वय १८) हा युवक शुक्रवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणारा हा तरुण रोज व्यायाम, धावणे आणि पोहण्याचा सराव करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा खानापूर येथील वागळे विद्यालयाचा बारावीपर्यंतचा विद्यार्थी होता. उंची कमी असल्यामुळे तो स्वतःची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी नियमित सराव करत असे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो आपल्या भावाला “मी पोहायला जातो” असे सांगून घरातून बाहेर पडला.
सायंकाळी काही ग्रामस्थांनी नदीकाठी त्याला पोहताना पाहिले, परंतु काही वेळानंतर तो घरी न परतल्याने घरच्यांना संशय आला. रात्री साडेनऊच्या सुमारास शोध घेतला असता नदीकिनारी त्याची इलेक्ट्रिक दुचाकी आणि कपडे दिसून आले. त्यामुळे तो नदीत बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आणि तातडीने खानापूर पोलिसांना कळविण्यात आले.
शनिवारी सकाळी पोलिस, स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू पथकाने शोधमोहीम सुरू केली आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत प्रथमेशच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील रवींद्र नागोजी पाटील हे निवृत्त सैनिक असून, मुलाचा असा अकाली मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.








