- हॉटेल, मंदिरे आणि वसतिगृहांवर परिणाम
- पुरवठा लवकर सुरळीत होणार मंत्री मुनियप्पा
बेंगळूर : राज्यात निर्माण झालेल्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या टंचाईचा मुद्दा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत जोरदार गाजला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरत हॉटेल उद्योग, मंदिरांतील प्रसाद व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांवर होणारा परिणाम तातडीने दूर करण्याची मागणी केली.
सभागृहात बोलताना सदस्य आयवान डिसोझा यांनी गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडल्याचे सांगितले. अनेक मंदिरांमध्ये प्रसाद बनविण्याची व्यवस्था विस्कळीत झाली असून पर्याय म्हणून लाकूड वापरावे लागत असल्याने लाकूड विक्रेत्यांकडून जादा दर आकारले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. यामुळे रिक्षा चालक आणि लहान व्यवसायिकांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे सांगत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, सदस्य एम. नागराज यांनी मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे सांगितले. याचा परिणाम लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांवरही होत असून अनेक समारंभ पुढे ढकलावे लागत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. गॅसचा संभाव्य काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
या चर्चेला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंधन कंपन्यांसोबत बैठक झाल्याची माहिती दिली. सध्या दोन जहाजे गॅस घेऊन येत असून आठवडाभरात पुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले. तोपर्यंत वसतिगृहे आणि रुग्णालयांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला जात असून हॉटेल व्यावसायिकांनी तात्पुरत्या उपाययोजने म्हणून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.







