चिकोडी / वार्ताहर
नागरमुन्नोळी (ता. चिकोडी) येथे रस्ता विचारण्याच्या नावाखाली एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गावकऱ्यांनी पकडून चांगलाच धडा शिकवला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात काम करत असलेल्या वृद्धेकडे दोन अनोळखी युवक आले. रस्ता विचारण्याच्या बहाण्याने ते तिच्याशी बोलू लागले आणि अचानक तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून वृद्धेने मोठ्याने आरडाओरड केली.
तिचा आवाज ऐकून आसपास काम करणारे मजूर आणि काही नागरिक तात्काळ धावत आले आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही युवकांना पकडले. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी त्यांना वीजेच्या खांबाला बांधून चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आरोपींना चिकोडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. वृद्धेची जागरूकता आणि स्थानिकांचा वेळेवर दिलेला प्रतिसाद यामुळे सोनसाखळी चोरीचा हा प्रयत्न अपयशी ठरला.








