- नागरिकांमध्ये संताप
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील बिडी गावात एका वृद्ध माजी सैनिकाला पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी लाठीने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला असून, तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, चिकमुनवळी गावातील हे माजी सैनिक आपल्या मुलासह मुलीच्या घरी दुचाकीवरून जात होते. दरम्यान, हेल्मेट न घातल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्यांना थांबवले आणि दंड भरण्याबाबत वाद झाल्याचे समजते. वाद वाढताच पोलिसांनी लाठीने मारहाण करत उद्धटपणे वागणूक दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने चित्रीत करून सोशल मीडियावर पोस्ट केला असून, त्यानंतर पोलिसांच्या वर्तनावर तीव्र टीका होत आहे. माजी सैनिकांवर अशा प्रकारे अमानुष वागणूक करणे अत्यंत निंदनीय असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.








