बेंगळूर : भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांची कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) अध्यक्षपदी निर्विवाद निवड झाली आहे. नामांकनपत्रांच्या परीक्षणाच्या वेळी त्यांच्या प्रतिस्पर्धी शांत कुमार यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्यानंतर प्रसाद यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला.
कर्नाटक उच्च न्यायालयाने यापूर्वी केएससीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका ७ डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र ब्रिजेश पटेल गटाचे प्रतिनिधी आणि डीएच व पीव्ही स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शांत कुमार यांचे नामांकन रद्द करण्यात आले. क्लबचे वार्षिक शुल्क चार वर्षे जमा न केल्याने त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते.
२०१० ते २०१३ या कार्यकाळात उपाध्यक्षपद सांभाळल्यानंतर तब्बल १२ वर्षांनी प्रसाद पुन्हा एकदा क्रिकेट प्रशासकीय क्षेत्रात पुनरागमन करत आहेत. त्यांच्या पॅनेलमध्ये उपाध्यक्षपदासाठी माजी फलंदाज सुजित सोमसुंदर, सचिव म्हणून विनय मृत्युंजय, सहसचिवपदासाठी ए. व्ही. शशीधर, तर खजिनदार म्हणून मधुकर यांचा समावेश आहे. तसेच बंगळूर विभागातील संस्थात्मक सदस्यपदासाठी कर्नाटकचे माजी क्रिकेटपटू अविनाश वैद्य यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहणार आहे.








