बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी वेदांत मिसाळे याने सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तीन पदके जिंकली आहेत. १६ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हरियाणामधील रोहतक येथे ही स्पर्धा पार पडली.

वेदांतने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे, २०० मीटर बटरफ्लाय प्रकारातही त्याने दुसरे सुवर्णपदक मिळवून आपल्या वर्चस्वाचे प्रदर्शन केले. याव्यतिरिक्त, ५० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत रौप्य पदक जिंकून त्याने आपल्या पदकांची संख्या तीनवर नेली.

वेदांतच्या या यशाबद्दल शालेय एस.एम.सी.कमिटीचे चेअरमन ज्योती कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्राध्यापक आर. एस. पाटील, सचिव नितीन घोरपडे, ॲड. डायरेक्टर श्रीमती मायादेवी अगसगेकर तसेच शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी वेदांत हा ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त केला. वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या कामगिरीमुळे शाळेचे तसेच बेळगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. त्याच्या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.