खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील सुलेगाळी येथे दोन जंगली हत्तींचा वीजप्रवाहाच्या झटक्याने झालेला मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे काही दिवसांपासून तुटून पडलेल्या वीजतारेमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, देवराईजवळील सुलेगाळी परिसरातील शेतकरी गणपती सातेरी गुरव आणि इतर शेतकरी वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या झटका करंट मशीनचा वापर करतात. अशावेळी शेतातून जाणाऱ्या हेस्कॉमच्या जमिनीवर तुटून पडलेल्या वीजवाहिनीची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती.
शनिवारी आणखी एक तार तुटून खाली आली आणि ती थेट झटका करंटच्या तारेला लागली. त्यामुळे त्या तारेतून अचानक विद्युत प्रवाह वाहू लागला. त्याच सुमारास अन्नाच्या शोधात आलेल्या दोन जंगली हत्तींचा या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, हलगा गावातील सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन हेस्कॉमवर निष्काळजीपणाचा आरोप केला. “तुटलेल्या तारांची योग्यवेळी दुरुस्ती केली असती, तर हे दोन निरपराध प्राणी मृत्युमुखी पडले नसते. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,” अशी त्यांची मागणी आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र नाराजी असून, वन्यजीवांच्या सुरक्षेबरोबरच वीज खात्याच्या कामकाजातील ढिसाळपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला धोकादायक वीजतारे तातडीने तपासून दुरुस्त करण्याची विनंती केली आहे.







