- रामदुर्ग तालुक्याच्या चूंचनूर गावातील घटना
रामदुर्ग / वार्ताहर
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चूंचनूर गावात कालव्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बसय्या सोमनवर (वय १०) आणि हनुमंत हगेद (वय १०) अशी मृत बालकांची नावे असून शुक्रवारी दुपारी दोघेही गावाजवळील कालव्यावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र, अचानक वाढलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले.
मुले बराच वेळ घरी न परतल्याने ग्रामस्थांनी शोध सुरू केला. कालव्याच्या काठावर त्यांचे कपडे आढळल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
या घटनेमुळे चूंचनूर गावात शोककळा पसरली असून पालकांनी आक्रोश केला आहे. घटनेची नोंद कटकोळ पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.








