- पाण्याअभावी हजारो माशांचा मृत्यू
बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटत असून बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी येथील तलाव कोरडा पडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने घटल्याने ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाला. तलावाच्या काठावर पडलेल्या माशांच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक मत्स्यपालक शंकरगौडा पाटील यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून या तलावात मासेमारीचा व्यवसाय सुरू ठेवला होता. यंदा त्यांनी तलावात सुमारे ५० हजारांहून अधिक मासे सोडून लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, तीव्र उन्हामुळे तलावातील पाणी पूर्णपणे आटल्याने माशांना हालचाल करण्यास जागा उरली नाही आणि ऑक्सिजनअभावी ते गुदमरून मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
या घटनेमुळे मत्स्यपालकाला मोठा आर्थिक फटका बसला असून गुंतवलेले भांडवलही परत मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शंकरगौडा पाटील यांनी शासनाने तातडीने लक्ष घालून नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जलस्रोत आटत असून जैवविविधतेवरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.








