चंदगड / प्रतिनिधी

धोकादायक तिलारी घाटात ब्रेक फेल झाल्याने आयशर टेम्पो १०० फूट खोल दरीत कोसळला. यात ट्रकचा चक्काचूर झाला असून, दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी चंदगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (२८ जून) दुपारी हा अपघात झाला. चालक शशीकूमार पी. (रा. परमेश्वर आप्पा वय ४० वर्षे, हाऊस नंबर १७१ शिमोगा भद्रावती रोड, भद्रावती) व विजय मनगुते (वय ३८) रा. मयुरी टॉकीज रोड चन्नम्मा सर्कल अंकली (ता. चिकोडी) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो बेळगाव येथून दोडामार्गच्या दिशेने जात होता. यावेळी तिलारी घाटात टेम्पोचा अचानक ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकमध्ये अडकलेल्या दोन जखमी कर्मचाऱ्यांना सुखरुपपणे बाहेर काढले आणि उपचारासाठी चंदगड येथील रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, गंभीर जखमींवर चंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून, पुढील उपचारासाठी त्यांना ‘बेळगाव येथील केएलई रुग्णालयात हलविण्यात आले. शशिकुमार याची प्रकृती चिंताजनक असून विजय मनगुते याचा हात मनगटातून तुटला आहे.

तिलारी घाट वाहतूकीसाठी धोकादायक मानला जातो. तीव्र उतार आणि वळण यामुळे या घाटातून वाहतूक जोखमीची असते. त्यामुळे घाटातून अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तरी सुद्धा, अशी वाहने राजरोस घाटात येऊन अपघातग्रस्त होत आहेत. पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे.