• शिवानंद महाविद्यालयात भारतीय सैन्यात रुजू झालेल्या ३० एनसीसी छात्रांचा सत्कार

कागवाड : एनसीसी म्हणजे भारतीय सैन्य तयार करण्याचा कारखाना असून ते देश सेवेचे पवित्र काम आहे. देशाला अशा तरुणांची गरज आहे. एकाच वर्षात तीसहून अधिक शिवानंद महाविद्यालयातील एनसीसी छात्र सैन्यात रुजू झाले आहेत ही खरच अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे असे प्रतिपादन नायब सुभेदार सुभाष भट्ट यांनी केले.

येथील शिवानंद महाविद्यालयात एन सी सी आणि माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने भारतीय सैन्यात रुजू झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात भट्ट प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. परमपूज्य श्री यतीश्वरानंद स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस पी तळवार होते. व्यासपीठावर हवालदार रणजित बडेकर, निवृत्त सुभेदार चिदानंद कुंभार, संस्थेचे सेक्रेटरी बी. ए. पाटील, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट अशोक आलगोंडी , प्राचार्य पी. बी. नंदयाळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. जे. के. पाटील आदी उपस्थित होते.

देशभक्तीपर गीत व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांचे स्वागत लेफ्टनंट अशोक आलगोंडी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. जे.  के.  पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले २६ कर्नाटक बटालियन बेळगाव चे हवालदार रणजित बडेकर यांनी अग्निवीरमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच एन सी सी मध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाचे सैन्यात खूप उपयोगी येत असल्याचे म्हणाले.

मंगसुळी येथील लक्ष करियर अकादमीचे संस्थापक निवृत्त सुभेदार चिदानंद कुंभार हे बोलताना म्हणाले, शिवानंद महाविद्यालयातील एनसीसी ही वैशिष्ठ्यपूर्ण असून अनेक तरूणांमध्ये देशप्रेम रुजविण्यात अग्रेसर आहे.

एकाच वेळी तीस एनसीसी विद्यार्थी अग्निवीर मध्ये भरती होण्याचा मान लेफ्टनंट अशोक आलगोंडी यांनी मिळवून दिल्याबद्दल प्राचार्य तळवार यांनी त्यांचे खास अभिनंदन करून गौरवोद्गार काढले. यावेळी भारतीय सैन्यात भरती होऊन ट्रेनिंग पूर्ण केलेल्या आणि आता नुकतीच निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालायचे प्राध्यापक आणि एनसीसी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली फडतरे यांनी केले तर आभार प्रा. विशाल बूर्ली यांनी मानले.