- स्थानिकांतून सत्तेच्या गैरवापराचा आरोप
कागवाड / वार्ताहर
कागवाड मतदारसंघातील काँग्रेस आमदार व वायव्य कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष राजू कागे यांच्या कन्येने सरकारी वाहनाचा खासगी कामासाठी वापर केल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे सोशल मीडियावर तीव्र चर्चा रंगली आहे.
चिक्कोडी शहरात आमदारांना देण्यात आलेले सरकारी वाहन तृप्ती कागे चालवत असल्याचे स्थानिकांनी टिपलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नियमानुसार अशी वाहने केवळ शासकीय कामकाज किंवा आमदारांच्या अधिकृत दौऱ्यांसाठी वापरण्याची मुभा असते. मात्र, खासगी कारणासाठी वाहन वापरल्याने सत्तेच्या गैरवापराचा आरोप होत आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून, जबाबदार पदावर असलेल्या आमदारांच्या कुटुंबाकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे सार्वजनिक मालमत्तेच्या वापराबाबत पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.








